Thursday, 31 March 2022

चिमण्यांचा जगण्यासाठीचा लढा !

 





























 

चिमण्यांकडे पाहा; त्या पुढच्या क्षणी काय करतील हे त्यांना माहिती नसते. आपणही त्यांच्याप्रमाणेच प्रत्येक क्षणन् क्षण जगला पाहिजे” … महात्मा गांधी

 

माणूस ज्या गोष्टी करू शकत नाहीत त्याची मला काळजी वाटत नाही, तर माणूस ज्या गोष्टी करू शकला त्याची मला नक्कीच काळजी वाटते’... कन्फ्यूशियस.

 

या लेखाच्या एकाच विषयासंदर्भात दोन अवतरणे वापरली आहेत त्यामागेही कारण आहे. अलिकडे मला जाणीव झाली की वर ज्यांची अवतरणे देण्यात आली आहेत त्यांच्यासारख्या महान लोकांच्या शब्दांमध्ये ज्ञानाचे भंडार आहे. त्यामुळे केवळ एकच अवतरण वापरणे किंवा त्यातून लेखाचे सार सांगणे माझ्यासाठी अधिकाधिक अवघड होऊ लागले आहे. मी माझे विचार मांडण्यासाठी जे काही विषय निवडतो त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. म्हणूनच, मी दोन किंवा अधिक अवतरणे वापरायला सुरुवात केली. यावेळचा विषय हा आपल्यापैकी प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आहे, तो म्हणजे चिमण्या. आपल्यापैकी बहुतेकजण लहानपणापासून काऊ-चिऊच्या गोष्टी ऐकत मोठे झाले आहेत. दुर्दैवाने आपण ज्याला वाढ किंवा विकास म्हणतो त्या काँक्रिटच्या जंगलांमध्ये कावळे अजूनही आहेत. मात्र बिचाऱ्या चिमण्यांना (लोककथांमध्येही त्या नेहमी दुबळेच दाखवले जातात) मात्र शहरांमधील गावांमधील आपल्या घरांमधून हुसकावून लावण्यात आले आहे. हा चिमण्यांचा जैविक संहार (सध्या अतिशय प्रचलित असलेला शब्द) एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाला आहे की सरतेशेवटी आपल्याला जागतिक चिमण्या दिन साजरा करण्याची गरज निर्माण झाली आहे. म्हणून या विषयांदर्भात लिहीत आहे कारण नुकताच २० मार्चला जागतिक चिमण्या दिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला मला एक प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन माझे मित्र उमेश वाघेला यांनी केले होते, जे स्वतः एक गिर्यारोहक आहेत त्यांच्या अलाईव्ह या संघटनेद्वारे वन्यजीवन संवर्धनाचे काम करतात.

यानिमित्ताने चिमणी या संकल्पनेवर आधारित विविध कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने लहान मुले (जी अतिशय चांगली गोष्ट आहे) तसेच मोठेही सहभागी झाले होते. कविता, संक्षिप्त कथा, चित्रकला, घोषवाक्ये अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे चिमण्यांविषयी चर्चा होऊ शकेल . मी त्या स्पर्धांच्या बक्षिस वितरणासाठी प्रमुख पाहुणा होतो.

माझ्यासोबत डॉ. पुजारी डॉ. अनिल महाबळ प्रमुख पाहुणे होते. डॉ. पुजारी हे भौतिकशास्त्रज्ञ आहे, मात्र त्यांनी चिमण्यांविषयी डोळे उघडणारे सादरीकरण दिले. त्यांचा गेल्या वीस हजार वर्षांमधील आजपर्यंतचा प्रवास उत्क्रांतीमध्ये ही गोड प्रजाती कशी टिकून राहिली किंवा तिने जे काही सहन केले आहे याचे वर्णन त्यांनी केले. आपल्या सगळ्यांना कोणे एकेकाळी हा पक्षी अगदी सहजपणे दिसायचा, मात्र आजकाल आपल्या पुणे शहरामध्ये तुमच्यापैकी किती जणांनी चिमण्यांचा थवा किंवा तुमच्या घराच्या किंवा कार्यालयाच्या अवतीभोवती घरटे बांधणारी चिमण्यांची जोडी पाहिली आहे ते मला सांगा. अगदी पन्नास टक्के वाचकांनीही सकारात्मक उत्तर दिले तर मला आनंद होईल. मात्र मला माहितीय चिमण्यांचाच पराभव होईल कारण आपल्यापैकी बहुतेकांना होय, आम्ही चिमण्या पाहिल्या आहेत हे उत्तर आठवण्यासाठी आपले डोके खाजवावे लागेल, कारण त्या आजकाल इतक्या सहजपणे दिसत नाहीत. मी पारितोषिक-विजेत्या कविता ऐकत होतो, तसेच चित्रे, घोषवाक्येही ऐकत होतो. त्यापैकी सर्वांमध्ये एकाच गोष्टीला लक्ष्य करण्यात आले. ती म्हणजे आपण वृक्षतोड करत आहोत, काँक्रिटची जंगले बांधत आहोत, चिमण्यांना राहण्यासाठी आवश्यक असलेल्या जागा हिरावून घेत आहोत. अनेक सादरीकरणामध्ये (कलात्मक सादरीकरणांमध्ये) आणखी एक मुद्दा मांडलेला होता, तो म्हणजे हे पक्षी शहरांपासून लांब जाण्याचे कारण म्हणजे मोबाइलचे टॉवर, ज्यासंदर्भात मी शेवटी टिप्पणी करेन. मात्र आपण चिमण्या किंवा असे कोणतेही पक्षी शहरातून नामशेष होत असल्याच्या कारणांवर भर देऊ, जे प्रमुख पाहुणा म्हणून माझ्या भाषणाचा गाभा होता.

सुरुवातीला मी उमेश त्याच्या चमूचे प्रमुख पाहुणा म्हणून मला आमंत्रित केल्याबद्दल त्यांच्या धाडसाचे आभार मानले कारण मी एक स्थापत्य अभियंता आहे, तसेच मी व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक आहे. सगळ्यांची सादरीकरणे पाहिल्यानंतर, असे दिसून आले की त्यातल्या बहुतेक मुलांनी या दोन जमातीच्या लोकांनाच चिमण्यांचे मुख्य शत्रू ठरवले होते. मी श्रोत्यांना सांगितले की, मी एक अभियंता आहे बांधकाम व्यावसायिकही आहे, मात्र या सहभागृहामध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्ती, ज्यामध्ये सहभागी झालेल्या मुलांचाही समावेश होतो माझे (किंवा कोठल्यातरी बांधकाम व्यावसायिकाचे) ग्राहक आहेत त्यामुळे आपण सर्वजण चिमण्यांना शहरातून हुसकावण्याच्या गुन्ह्याचा एक भाग आहोत, बरोबर? चिमण्यांचे संवर्धन करण्यासाठी (चिमण्यांच्या गरजा समजून घेण्यासाठी) एकमेकांवर दोषारोपण करता चिमण्यांच्या गरजांना आपल्या जीवनशैलीमध्ये समाविष्ट करून घेणे आवश्यक आहे, मग ते घर असो, रस्ता, उद्योग किंवा एखादा शॉपिंग मॉल! ज्याप्रकारे आपल्याला घर आवश्यक असते, तसेच एका चिमणीलाही तिचे घर हवे असते.आपल्या घरांमुळे किंवा मानवी विकास कामांमुळे चिमण्या आपल्या शहरांबाहेर गेलेल्या नाहीत तर आपल्या स्वतःच्या घरांविषयीच्या तसेच आपण ज्याला विकास म्हणतो त्या इतर बांधकामांविषयीच्या दृष्टीकोनामुळे हे झाले आहे. खरेतर वर्षानुवर्षे चिमण्या माणसांसोबत आनंदाने जगत होत्या. त्या मानवाच्या वसाहतींचा अविभाज्य भाग होत्या, म्हणूनच चिमण्यांच्या सर्वात सामान्य प्रजातीचे नाव, घरगुती चिमणी (हाऊस स्पॅरो ) असे आहे!

 

त्यासाठी आपण चिमण्यांना (तसेच अशाप्रकारच्या इतर पक्ष्यांना) जगण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. माझ्यावर विश्वास ठेवा चिमण्यांच्या गरजा अतिशय कमी असतात आपल्या विकासकामांमध्ये त्यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च करण्याचीही आवश्यकता नाही! फक्त त्यासाठी एक हिरवे मन असले पाहिजे तसेच जमीनीचा शक्यतो प्रत्येक तुकडा केवळ आपल्यासाठीच ठेवण्याची आपली हाव कमी करता आली पाहिजे. चिमण्यांना, अन्नासाठी नियमितपणे धान्याचा पुरवठा, थोडेफार कीटक, वाळके गवत, पाने, थोडी मोकळी जमीन, त्यावरील माती शांतता म्हणजे ध्वनी तसेच वायू प्रदूषण कमी असावे एवढीच अपेक्षा असते. चिमण्या, बाया सुगरण पक्ष्यांप्रमाणे टांगती किंवा केवळ पाने, गवत यापासून घरटी बांधू शकत नाहीत. त्यांना त्यांच्या घरट्यांना आधार देण्यासाठी सुरक्षित जागा हवी असते तसेच वर नमूद केलेल्या सर्व बाबी अंडी घालण्यासाठी पिल्लांना वाढवण्यासाठी आवश्यक असतात. आपण त्यांना नेमक्या अशाच मूलभूत गोष्टी देत नाही. तुमचा माझ्यावर विश्वास नसेल, तर आपल्या कोणत्याही इमारतीवर नजर टाका तुम्हाला काय दिसते ते सांगा? सगळीकडे  काँक्रिट किंवा काचा, या इमारतींमध्ये चिमण्यांना त्यांची घरटी बांधण्यासाठी अजिबात जागा उरली नाही; आपण माती असलेल्या जमीनीचा लहानसाही तुकडा सोडत नाही तर तो आपल्या कारचे पार्किंग, तरण तलाव किंवा तथाकथित सुशोभित बगिच्यांसाठी वापरला जातो. त्याव्यतिरिक्त आपल्याकडे कारचे कर्कश्श हॉर्न, डीजे, फटाके असे विविध प्रकारचे ध्वनी प्रदूषण असते. आपण ज्या हवेत श्वास घेतो ती अगदी सुदृढ माणसासाठीही फारशी चांगली नसते. अशावेळी आपण चिमण्यांसारख्या नाजूक पक्ष्याने त्यामध्ये श्वास घ्यावा जगावे अशी अपेक्षा कशी करू शकतो. तर, आपल्यापैकी प्रत्येकाने त्याच्या किंवा तिच्या बांधकाम व्यावसायिकाला, उद्योजकांना तसेच सरकारला (जे रस्ते, रेल्वे स्थानक विमानतळांचे बांधकाम करते) विचारले पाहिजे की वरीलपैकी कोणतेही बांधकाम करताना त्यामध्ये चिमण्यांचाही समावेश करून घेण्यासाठी ते काय करत आहेत. दुर्दैवाने कुणीही ग्राहक किंवा अशा बांधकामांचा वापर करणारे हा प्रश्न विचारत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

मोबाइलच्या टॉवर्सचा चिमण्यांवर काय परिणाम होतो याविषयी बोलायचे झाले, तर माझा स्वतःचा अनुभव किंवा तर्क असा आहे की जगभरातील पक्षी हे असे टॉवर्स असूनही टिकून राहिले आहे. मी असे अनेक पक्षी पाहिले आहेत ज्यांनी हे मोबाईल टॉवर्स तसेच त्या भोवतालच्या बांधकामांच्या ठिकाणी सुरक्षितपणे घरटी बांधली आहेत. माझ्या माहितीप्रमाणे अजूनपर्यंततरी मोबाइल टॉवर्स कोणत्याही पक्ष्यांसाठी धोकादायक असल्याचे किंवा त्यामुळे त्यांना अपाय होत असल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही.

खरे म्हणजे आपण आपल्या विकासकामांमध्ये चिमण्यांच्या गरजांचा समावेश करून घ्यायला विसरलो. यामुळे चिमण्यांकडे एकच पर्याय उरला तो म्हणजे माणसांना सोडून जाणे नवीन घर शोधणेमाझ्यावर विश्वास ठेवा, वाढत्या शहरीकरणामध्ये हे सोपे काम नाही. एक उप-प्रजाती वगळता, चिमण्यांची उत्क्रांती होऊन त्या स्थलांतर करण्यायोग्य झालेल्या नाहीत; तर मग अशा परिस्थितीत चिमण्यांचे काय होते? सोपे आहे, एक तर त्या नामशेष पावतात किंवा अंडी देणे थांबवतात आपल्या आयुष्यातून नामशेष होतात. मात्र थोडासा विचार करून आपण या गोंडस प्रजातीला नामशेष होण्यापासून वाचवू शकतो. याचे कारण म्हणजे चिमण्या अतिशय चिवट प्रजाती आहे इतकी वर्षे त्या माणसांसोबत टिकून राहिल्या आहेत. मात्र त्यांना टिकवणे हे कुणा एका व्यक्तीचे किंवा समुदायाचे काम नाही तर संपूर्ण समाजाचे काम आहे. उमेशने त्याच्या सादरणीकरणात, त्यांच्या साथीदारांच्या एका उपक्रमाचा उल्लेख केला होता तो म्हणजे निसर्गासाठी एक दिवस देणे. मी श्रोत्यांना आवाहन केले की, आपल्याला चिमण्यांना पुन्हा आपल्या शहरांमध्ये घरांमध्ये बोलवायचे असेल, तर फक्त कॅलेंडरमधील एक दिवस देणे पुरेसे नाही. त्याऐवजी आपल्यापैकी प्रत्येकाने दररोज किमान दहा मिनिटे चिमण्यांसाठी दिली पाहिजेत. असे केले तरच चिमण्यांसाठी थोडीफार आशा आहे, नाहीतर आपण फक्त जागतिक चिमण्या दिवसच साजरा करू, मात्र आपल्या जगात कुठेही चिमण्या अस्तित्वात असणार नाहीत!

 

You can read in English:

 

http://visonoflife.blogspot.com/2022/03/sparrows-battle-for-surviving-from.html 

 

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com

 


No comments:

Post a Comment