Saturday, 19 March 2022

परतफेड जंगलांची !!

 


































   

 

 

"जंगलांनी आपल्याला काय दिले आहे यापेक्षाही आपण जंगलांना काय देणार आहोत यावरून आपले भविष्य ठरणार आहे"…


हे कुणा मोठ्या पर्यावरणवाद्याचे किंवा वन्यजीवन संशोधकाचे शब्द नाहीत, तर जेव्हा कुणीही मला जंगलांबद्दल किंवा वन्यजीवनाबद्दल एवढा जिव्हाळा का वाटतो असे विचारते तेव्हा मला वरील उत्तर द्यावेसे वाटते. जेव्हा परतफेड करायची वेळ येते तेव्हा त्याला काहीच मर्यादा नसते विशेषतः जेव्हा ही परतफेड सर्वोत्तम स्वरुपातल्या निसर्गाला म्हणजेच जंगलाला करायची असते. यासंदर्भात स्वयंसेवी संस्था अनेक वन्यजीवप्रेमी म्हणतील की जंगलांना किंवा वन्यजीवनाला परतफेड करायची गरज नाही. ते जसे आहेत तसे राहू द्या. मात्र मला असे म्हणावेसे वाटते की (पूर्णपणे आदर राखत) त्यांना अजूनही जंगल म्हणजे काय हे समजलेलेच नाही. तुम्हाला जेव्हा एखाद्या निरोगी माणसाची देखभाल करायला सांगितले जाते, तेव्हा तुम्ही त्याला तो जसा आहे तसे राहू देऊ शकता. तुम्ही केवळ लांबून नजर ठेवली तरी पुरेसे असते. मात्र जेव्हा तुम्हाला एखाद्या अपंग व्यक्तीची किंवा रुग्णाची देखभाल करायची असते, तेव्हा तुम्ही त्याला एकटे सोडाल का? याचे उत्तर असेल नाही, बरोबर? किंबहुना तुम्ही अशा अपंग व्यक्तींची शक्य ती सर्व काळजी घेण्याचा त्यांना चांगले अन्न, निवारा औषधोपचार अशा आवश्यक त्या सर्व गोष्टी देऊन त्यांचे जीवन आरामदायक होईल असा प्रयत्न कराल. जंगले वन्यजीवन संवर्धनाच्या आघाडीवरही अशीच परिस्थिती आहे कारण साधारण शतकभरापूर्वीची (१०० वर्षे) परिस्थिती असती, तर मी काहीच केले नसते, वन्यजीवन आहे तसेच राहू दिले असते. मात्र गेल्या १०० वर्षांच्या काळात आपण एकेकाळी निरोगी असलेल्या जंगलांची स्थिती दयनीय करून टाकली आहे. आता जर आपण जंगल तसेच वन्यजीवन आरामदायक व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले नाहीत, तर ते नक्कीच नष्ट होईल, हाच जंगलांना परतफेड करण्यामागचा माझा तर्क आहे.


तुम्हाला जेव्हा जंगलांना परतफेड करायची असते तेव्हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो जागरुकता, कारण तुम्हाला कुणाचे किंवा कशाचे संवर्धन करायचे आहे हेच माहिती नसेल तर, तुम्ही त्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे संवर्धन कसे करू शकाल, बरोबर? जंगलांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी माहितीपट तयार करणे, छायाचित्रांचा वापर करणे, वन्यजीवनासंदर्भात प्रदर्शने आयोजित करणे, वेब परिसंवाद आयोजित करणे, शाळांमध्ये वन्यजीवनाविषयी सादरीकरणे करणे, शाळा महाविद्यालयांमध्ये नेचर क्लब चालविणे, असे शेकडो उपक्रम राबवता येतील. आम्ही आमच्या नुकत्याच पूर्ण झालेल्या एका प्रकल्पामध्ये एक उपक्रम राबवला (म्हणजे प्रयत्न केला प्रयत्नांपैकी). त्यात आम्ही भारतामध्ये आढळणाऱ्या विविध नैसर्गिक अधिवासांची (जंगलांची) रंगीत चित्रे बनवून घेतली प्रत्येक मजल्यावरील लिफ्टच्या सामाईक लॉबीमध्ये ही चित्रे लावली. प्रत्येक चित्राखाली त्याविषयी (चित्रातील नैसर्गिक अधिवासाविषयी) छोटीशी तळटीप लावली आहे. यामुळे येथील रहिवासी तसेच पाहुणे ती पाहू शकतात त्यांना कशाचे संवर्धन करायचे आहे हे जाणून घेऊ शकतात. इथे या जंगलांविषयी थोडे अधिक तपशीलाने लिहीत आहे ज्यांनी आपल्याला निरपेक्षपणे, मुक्तहस्ताने कितीतरी दिले आहे. मी सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करतो, येथे दिलेली सर्व माहिती सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत आहे फारशी आकडेवारी किंवा सांख्यिकी दिलेली नाही. याचे कारण म्हणजे निसर्गाचे मोजमाप आकडेवारीत करता येत नाही तर ते अनुभवावे लागते, असे मला वाटते

1.ताडोबा अभयारण्य व्याघ्र प्रकल्प!

हे बांबूचे वन पिवळ्या-काळ्या पट्ट्यांच्या प्राण्याचे म्हणजेच वाघांचे सर्वात आवडते निवासस्थान आहे. ताडोबामध्ये वाघांचे संख्या सर्वाधिक असल्यामुळे एकीकडे ती वाघांची जागतिक राजधानी आहे. तर दुसरीकडे यामुळे माणूस प्राण्यातील संघर्ष ही एक मोठी समस्या आहे कारण या दोन्ही प्रजाती आपापल्या जागेसाठी लढत आहेत. मध्य भारतात, महाराष्ट्रातील चंद्रपूरजवळील ताडोबामध्ये प्रामुख्याने बांबुची वने सागवान वृक्ष आहेत, त्याचशिवाय इतरही मिश्र-प्रकारची झाडे-झुडुपे पाहायला मिळतात. उन्हाळ्यामध्ये पारा ४५ अंशांच्या वर गेल्यावर वाघ थंडाव्यासाठी घनदाट जंगलातून पाणवठ्यापाशी येतात, त्यामुळे पर्यटकांना सहजपणे छायाचित्रे काढता येतात.

 

ताडोबाच्या जंगलांभोवताली राहणाऱ्या लोकांना वन्यजीवनासह वाघांनाही स्वीकारून त्यांच्यासह सौहार्दाने राहण्याविषयी जागरुक करणे ही काळाची खरी गरज आहे. 


2.पश्चिम घाट निसर्गाचा ठेवा

आपल्या देशातील पश्चिम किनारपट्टीला समांतर जवळपास १५०० किलोमीटरच्या पट्ट्यात पर्वत रांगा पठारांच्या रुपाने जैवविविधतेचा कदाचित सर्वोत्तम ठेवा लाभलेला आहे. या अधिवासामध्ये महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू गुजरातच्या काही भागाचा समावेश होतो. शेकरू (मोठी खार), महाधनेश, फुलपाखरे, बेडूक, साप तसेच वाघ, अशा असंख्य प्राण्यांच्या अनेक ज्ञात अज्ञात प्रजाती, कीटक, झाडे-झुडुपे पक्ष्यांनी हे जंगल समृद्ध आहे. "देवराई" म्हणजे, पवित्र राखीव वने हे पश्चिम घाटांचे सर्वोत्तम वैशिष्ट्य आहे.

औद्योगिकरण तसेच पायाभूत सुविधांचा विकास हा संपूर्ण पश्चिम घाटाच्या प्रदेशाला असलेला मोठा धोका आहे. आपण आता विकास निसर्ग यादरम्यान संतुलन राखणे आवश्यक आहे. तरच पश्चिम घाट आपण वाचवू शकू

3. पाणथळ प्रदेशाची जादू...

अनेक वन्यजीवप्रेमींना हे माहितीही नसते की नैसर्गिक तलाव, धरणाचे पाणलोट क्षेत्र, पाणथळ जागा जेथे  वर्षभर ताजे पाणी उपलब्ध असते, अशा ठिकाणाचे पाणवठे त्यांच्याभोवती असलेली झाडेझुडुपे, हीदेखील एक प्रकारची जंगलेच आहेत. अनेक ठिकाणी स्थलांतरित पक्ष्यांसाठी तो स्वर्ग आहे, जेथे राजहंसासारखे पाणथळ जागांमध्ये आढळणारे पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून या जैव विविधतेने समृद्ध अधिवासांना भेट देण्यासाठी येतात. महाराष्ट्रामध्ये पुण्याजवळ उजनीचे पाणलोट क्षेत्र हे त्याचे जिवंत उदाहरण आहे.

दुर्दैवाने, या सर्व पाणथळीच्या क्षेत्रांना शहरीकरण ताज्या पाण्याच्या स्रोताचे प्रदूषण यामुळे अतिशय मोठा धोका निर्माण झाला आहे, यामुळे येथील कीटक तसेच पक्ष्यांसह अनेक प्रजाती नामशेष होत आहेत.

4.कॉर्बेट... अद्भूतरम्य हिमालयीन जंगले.

सुरुवातीला येथील अथांग पसरलेल्या गवताच्या कुरणांना शेवटच नाही असे वाटते, मात्र एकीकडे ती घनदाट जंगलांना जाऊन मिळतात जे सर्व प्रकारची झाडे, वेली, झुडुपे यांचे मिश्रण आहे, तर दुसरीकडे ती डोंगरांमध्ये जाऊन मिसळतात पुढे जाऊन ते पर्वतरागांमध्ये जाऊन मिसळतात, दुसऱ्या बाजूला रामगंगा नदी आहे. या पार्श्वभूमीवर लहानशा आकृत्या हालत असतात, जे खरेतर हत्ती आहेत. दूरवरून तुम्ही वाघांची डरकाळीही ऐकू शकता, हा आवाज ऐकून तुमचे रोमांच उभे राहतात. येथील कॉर्बेट अभयारण्य हे हिमालयीन जंगलांमधील एक उत्तम अधिवास आहे, येथील ऱ्होडोड्रेंट्रॉन नावाच्या मोठ्या फुलांच्या सदाहरित झाडांवर शेकडो रंगीबेरंगी पक्षी घरटी बांधतात.

येथील रिसॉर्टमध्ये मोठ्या संख्येने येणारे पर्यटक त्याचसोबत होत असलेले शहरीकरण हे या जंगलांना असलेले मोठे धोके आहेत. त्याचप्रमाणे, विविध कारणांनी होत असलेली वृक्ष तोड या अधिवासांच्या विनाशाला कारणीभूत ठरली आहे.

5.चित्ताकर्षक मेळघाट सापुताऱ्याच्या पर्वतरांगांमधील जंगले

सापुताऱ्याच्या पर्वतरांगा संपूर्ण मध्य भारतात पसरल्या आहेत ज्यामुळे दक्षिणेकडील द्वीपकल्प विभागला गेला आहे. मध्यप्रदेश महाराष्ट्राच्या सीमा या पर्वतरांगांना लागून आहेत, मेळघाटाचे जंगल या भागात पसरले आहे. येथे सर्वात घनदाट वृक्षराजी असून, हा आपल्या देशातील कदाचित सर्वात गरीब प्रदेश आहे. हजारो किलोमीटरची जंगले ही एकीकडे निसर्गासाठी वरदान आहे मात्र त्याचवेळी ते स्थानिक आदिवासी रहिवाशांसाठी हा शाप आहे, कारण इथल्या अनेक खेड्यांमध्ये किंवा गावांमध्ये मानवी जीवनासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही मूलभूत सुविधा नाहीत.

या जंगलांनाही धोका आहे कारण जंगलात भोवतालच्या भागात राहणाऱ्या लोकांचे कुपोषण दारिद्र्य हे मेळघाटातील वन्यजीवनाचे सर्वात मोठे धोके आहेत. घनदाट वृक्षराजीने समृद्ध जंगले असलेल्या पर्वतरांगा त्यातून खळाळत्या नद्या यामुळे मेळघाट खरोखर अद्भूत आहे!

6.कान्हा.... मध्य भारतातील साल वृक्षांचा स्वर्ग

कान्हा हे कदाचित भारतातील सर्वाधिक लोकप्रिय माझ्या मते सर्वोत्तम जंगल आहे. या विस्तीर्ण प्रदेशामध्ये मध्यप्रदेश छत्तिसगढमधील, म्हणजेच मध्य भारतातील हजारो चौरस किलोमीटरचे क्षेत्र व्यापलेले आहे. या जंगलामध्ये प्रामुख्याने साल वृक्षांचा समावेश होतो जी वर्षातील बहुतेक काळ सदाहरित असतात. म्हणूनच मध्य भारतातील इतर जंगलांच्या उलट कान्हातील भूप्रदेश अतिशय सुंदर आहे. येथील डोंगर, कुरणे, दऱ्या खोऱ्यात वाघ, बिबटे तसेच त्यांच्या सावजांसाठी, विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठी सरपटणाऱ्या प्राण्यांसाठीही राहायला अतिशय योग्य आहे. वाघांव्यतिरिक्त आढळणारी बारशिंगा जातीची हरिणे हे कान्हा जंगलाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. एकेकाळी ती नामशेष होण्याच्या मार्गावर होती. मात्र वन विभागाच्या प्रयत्नांमुळे आता पुन्हा एकदा डौलदार चालीचे बारशिंगा कान्हाच्या भूप्रदेशात दिसून येत आहेत. खरोखरच, कान्हासारखी ठिकाणे आपला खराखुरा ठेवा आहे, जो आपण पूर्णपणे झटून जपला पाहिजे!

 7.गवताळ पट्टेगवतातील छुपे सौंदर्य.

गवताळ प्रदेश हा जंगलांच्या सर्वोत्तम प्रकारांपैकी एक आहे, तो प्रामुख्याने मध्य भारतात सर्वत्र आढळतो. हे सकृतदर्शनी वाळलेल्या (वर्षाच्या बहुतेक काळात) गवताचे झुडुपांचे पट्टे पर्जन्यछायेच्या म्हणजे एकूणच कमी पावसाच्या प्रदेशामध्ये आढळतात. अनेक प्रकारचे स्थलांतरित पक्षी, स्थानिक पक्षी तसेच भारतीय लांडगा, कोल्हा, रानमांजर यासारखे सस्तन प्राणी अनेक प्रकारच्या सरपटणाऱ्या प्राण्यांचा हा अधिवास आहे.

देशभरातली गवताळ पट्ट्यांना माणसांकडून विविध कारणांसाठी धोका आहे, उदाहरणार्थ गुरांचे चरणे, घरांसाठी भूखंड तयार करणे, कचरा टाकणे, उद्योगधंदे उभारणे इत्यादी. अनेक प्रजातींना यामुळे आपला अधिवास म्हणजेच घर गमवावे लागल्यामुळे त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

8. खारफुटी जंगलेजेथे नदी सागराला मिळते!

आपल्या देशाला जवळपास ७५०० किलोमीटर लांबीच्या सागरी किनाऱ्याचे वरदान लाभले आहे. हिमालयाच्या पर्वतरांगांपासून मध्य भारतातील पठारांपासून शेकडो नद्या ओढ्यांचे ताजे पाणी समुद्राला येऊन मिळते. हे गोडे पाणी खारे पाणी येऊन जेथे मिळते तेथे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी जंगले तयार होतात, ती म्हणजे खारफुटीची. या पाण्यामध्ये वाढणाऱ्या अतिशय घनदाट वनस्पती असतात त्या जलचर तसेच अनेक पक्षी सस्तन प्राण्यांचे घर असतात. सुंदरबन हे त्याचे अतिशय उत्तम उदाहरण आहे जेथे वाघांना अन्न म्हणून मासेमारी करण्याची सवय आहे.

जलाशयांमध्ये बेधडकपणे कचरा टाकून रसायने सोडून आपण ते झपाट्याने प्रदूषित करत असल्यामुळे, तसेच व्यावसायिक कारणांसाठी समुद्र किनाऱ्यांवर भराव टाकला जात असल्यामुळे खारफुटीच्या जंगलांना सर्वात मोठा धोका निर्माण झाला आहे.

9. वाळवंटी जंगलेयेथील रेती जिवंत आहे!

भारताला अतिशय वैशिष्ट्यपूर्ण भूप्रदेश लाभलेला आहे, जर उत्तरेकडे बर्फाच्छादित हिमालय असेल, तर पूर्वेकडे घनदाट हिरवीगार पर्जन्यवने आहेत नैऋत्येला/अग्नेयेला आपल्याकडे सागरी वने आहेत तर वायव्येला आपल्याकडे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी मरुवने आहेत. थार वाळवंटाचे क्षेत्र जवळपास ,००,००० चौ.किमीचे आहे. मात्र येथे अथांग पसरलेल्या निर्जीव पिवळ्या रेतीवर जाऊ नका. येथे वर्षभरात इंचापेक्षाही कमी पर्जवृष्टी होते. तरीही त्यामध्ये उगवणारी खाजरी काही झुडुपे येथील जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी पुरेशी असतात. येथे तुम्हाला वन्य गाढव, काळवीट यासारखे प्राणी, स्थलांतरित पक्षी सरपटणारे प्राणी आढळतात, वाळवंट हे त्यांच्यासाठी अतिशय योग्य घर आहे.

ही केवळ एकमेव जंगले अशी असतील जेथे मानवाचा हस्तक्षेप फारसा नाही. मात्र तरीही शिकार, तसेच जी काही थोडीफार झाडे आहेत ती जळणासाठी कापणे, हे या मरुवनातील झाडा-झुडुपांना प्राण्यांना असलेले दोन प्रमुख धोके आहेत.

10.सप्त भगिनींचे जंगल अतुलनीय ईशान्य!

सप्त भगिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूर्वेकडील सात राज्यांच्या सीमेवरील जंगले ही कदाचित आपल्या देशातील सर्वाधिक वसती असलेले सर्वात कमी अभ्यासलेली जंगले आहेत. मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी, डोंगराळ भाग, बहुतेक भागांमध्ये दळणवळण अतिशय अवघड असल्यामुळे ही जंगले अतिशय गूढ आहेत. येथे अतिशय दुर्मिळ प्राणी, पक्षी तसेच वैविध्यपूर्ण रंगांची फुले आढळतात. ही जंगले एवढी घनदाट आहेत की अनेक ठिकाणी सूर्यप्रकाश जमीनीपर्यंत पोहोचतही नाही.

हा डोंगराळ भाग जंगलांमुळे आपल्या देशाला चीनला लागून असलेल्या सीमेवर अतिशय उत्तम संरक्षण मिळाले आहे. तरीही येथील जैव विविधतेला शेतीमुळे अतिक्रमण, लाकूड तोड तसेच शिकारीचा धोका आहे. ही जंगले अतिशय घनदाट दुर्गम आहेत तसेच त्यांची व्याप्ती येथील भूभागामुळे त्यांचे निरीक्षण करणे हे अवघड काम आहे.

वर नमूद केलेल्या अधिवासांव्यतिरिक्त भारतातील प्रत्येक खेडे, शहर गावामध्ये विविध स्वरुपात स्वतःचे लहानसे जंगल असते, ज्यामध्ये माणसाव्यतिरिक्त इतरही प्रजाती राहतात. आपल्या राहत्या जागेला आपण घर म्हणतो, त्यामुळे आपण प्राण्यांनाही त्यांची जागा देऊ लागतो हे साधी गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे, असे झाले तरच जंगलातील प्रत्येक प्रजातीसाठी काही आशा असेल.

रंगस्पर्शने अतिशय अर्थपूर्ण रंगीत चित्रे तयार करून दिल्याबद्दल जयराज आर्ट्सने त्यासाठी सुंदर चौकटी बनवून दिल्याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि आपल्यातील प्रत्येकाने जंगलासाठी परतफेड करण्याचा विचार करावा हि विनंती करतो !

-

You can read in English version:

http://visonoflife.blogspot.com/2022/03/giving-back-to-forests.html

 

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com

 

 


No comments:

Post a Comment